भारतामधील भाषा

भारतीय उपखंडातील स्थानिक भाषांचा नकाशा

भारतातील भाषा प्रामुख्याने दोन मुख्य भाषिक गटांतील आहेत.
१. इंडो-युरोपीय (ज्याच्या इंडो-आर्य शाखेतील भाषा जवळपास ७४% लोकसंख्येकडून वापरल्या जातात)
२. द्रविडीय भाषा (जवळपास २४% लोकसंख्येकडून वापरली जाते).
भारतात इतर बोलल्या जाणार्‍या भाषा या ऑस्ट्रो-एशियाटिक आणि तिबेटो-बर्मन भाषिक गटांतील तसेच स्वतंत्र भाषा आहेत.
अंदमान बेटांवर बोलली जाणारी अंदमानी भाषा ही कोणत्याही भाषिक गटांशी निगडित नाही असे वाटते.
भारतातील बोलीभाषांची संख्या ही १२२२, तर देशातील २३४ भाषा या कुणाच्या ना कुणाच्या मातृभाषा आहेत. त्यांपैकी २४ भाषा बोलणार्‍या भाषकांची संख्या ही प्रत्येकी दहा लाख किंवा अधिक आहे. भारतीय भाषांच्या इतिहासात फारसी आणि इंग्रजी भाषांचा प्रभाव मोठा आहे. संस्कृत आणि तमिळ या भाषा या भारतातील सर्वांत जुन्या भाषा मानल्या जातात. संस्कृत, तमिळ, तेलुगू, ओडिया, कन्‍नड, मल्याळम या भाषांना अभिजात भाषा म्हणून मान्यता आहे. भाषा अभिजात ठरण्यापूर्वी ती किमान १५०० ते २००० वर्षे इतकी जुनी असावी लागते. मराठी भाषा ही इसवी सनापूर्वी २०७ या वर्षी ब्राह्मी लिपीत लिहिली जात होती हे सिद्ध झाले असूनही तिला अभिजात भाषेचा दर्जा नाही.

भारतीय राज्यघटनेच्या कलम ३४३ नुसार इंग्रजी आणि देवनागरी लिपीत लिहिलेली हिंदी ह्या संघराज्याच्या व्यवहाराच्या भाषा आहेत.

कलम ३४५ नुसार राज्यसरकारांनी राज्यासाठी अधिकृत मानलेली भाषा ही भारतीय राज्यघटनेनुसार राजभाषा मानली जाते.

१९६७ मध्ये झालेल्या २१ व्या घटना दुरुस्तीपर्यंत १४ भाषांना अधिकृत दर्जा होता. आताच्या सुधारणेनुसार सिंधी, कोंकणी, मणीपुरी आणि नेपाळी वगैरेंचा अधिकृत भाषांमध्ये समावेश करण्यात आला. त्यानुसार अधिकृत भाषांची संख्या ही २२ झाली.

भारतातील राज्यांची रचना भाषिक तत्त्वानुसार करण्यात आली असून प्रत्येक राज्य हे आपल्या अंतर्गत व्यवहारासाठी व शिक्षणासाठी कोणती भाषा वापरावी याचा निर्णय घेऊ शकते.

सध्या भारतीय घटनेनुसार देशात बोलल्या जाणार्‍या २२ प्रादेशिक भाषांना शासकीय राजभाषेचा दर्जा दिला आहे. यांतआसामी, उर्दू, ओरिया, कन्नड, काश्मिरी, कोंकणी, गुजराती, डोगरी, तमिळ, तेलुगू, नेपाळी, पंजाबी, बंगाली, बोडो, मराठी, मल्याळम, मैतेई, मैथिली, संथाली, संस्कृत, सिंधी, आणि हिंदी, यांचा समावेश होतो.

हिंदी ही संघराज्याची व्यवहाराची भाषा असण्याबरोबरच उत्तर प्रदेश, उत्तरांचल, छत्तीसगढ, झारखंड, दिल्ली, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या राज्यांची राजभाषा आहे.

इंग्रजी ही देखील संघराज्याची अधिकृत भाषा आहे. अनेकदा हिंदी ही एक राष्ट्रभाषा म्हणून समजली जाते परंतु भारतीय संविधानाने कोणत्याही भाषेला हा दर्जा दिलेला नाही.

भाषिक गट/कुटुंब

भारतीय भाषांची प्रमुख भाषिक गटांच्या साहाय्याने वर्गवारी करता येते. यातील इंडो-यूरोपीय हा सर्वांत मोठा गट आहे. या गटातील इंडो-आर्य शाखा ही प्रमुख आहे. (जवळपास ७० कोटी लोकसंख्या). त्याबरोबरच पर्शियन, पोर्तुगीज किंवा फ्रेंच आणि इंग्रजी या भाषांचाही समावेश होतो. दुसरा प्रमुख गट हा द्रविडीय भाषांचा आहे. जवळपास २० कोटी लोकसंख्या या गटातील भाषा बोलते. इतर लहान गटांमध्ये मुंडा (९० लक्ष लोकसंख्या), तिबेटो-बर्मन (६० लक्ष) यांचा समावेश होतो. निहाली या स्वतंत्र भाषेचाही भारतातील भाषांमध्ये समावेश होतो.

Other Languages
العربية: لغات الهند
অসমীয়া: ভাৰতীয় ভাষা
भोजपुरी: भारत के भाषा
čeština: Jazyky Indie
français: Langues en Inde
Bahasa Indonesia: Bahasa di India
한국어: 인도의 언어
lietuvių: Indijos kalbos
македонски: Јазици на Индија
नेपाल भाषा: भारतयागू भाषात
Nederlands: Talen in India
norsk nynorsk: Språk i India
português: Línguas da Índia
українська: Мови Індії
吴语: 印度语言
中文: 印度语言
Bân-lâm-gú: Ìn-tō͘ ê gí-giân